शिरपूर (प्रतिनिधी पवन मराठे) | राहुरी येथील एका गंभीर फायरिंग प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मुळा धरण परिसरातून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतुसे आणि इतर साहित्यासह एकूण २,०४,६००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २९ मे २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास मोमीन आखाडा (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी फिर्यादी दगडू गंगाराम कोहकडे यांच्यावर आरोपी प्रवीण बाबासाहेब कोहकडे याने जुन्या गुन्ह्याच्या रागातून जीवे मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला होता आणि तो तिथून पळून गेला होता. या घटनेप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६२४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९ सह आर्म ॲक्ट कायदा कलम ७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘मुळा डॅम’ परिसरात लागला सुगावागुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष शोध पथक तयार करण्यात आले. हे पथक आरोपीचा शोध घेत असतानाच, दिनांक २९ मे २०२६ रोजी पोलिसांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली की, आरोपी हा बारागाव नांदूर ते मुळा डॅम परिसरात संशयास्पद रितीने फिरत आहे. माहिती मिळताच पथकाने तात्काळ मुळा धरण परिसरात जाऊन खात्री केली असता, एक काळ्या रंगाचे जॅकेट घातलेला इसम विना नंबरच्या मोटरसायकलवरून जात असताना दिसला. पोलिसांनी त्याला वेढा घालून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रवीण बाबासाहेब कोहकडे (वय २२ वर्षे, रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) असल्याचे कबूल केले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या झडतीमध्ये पोलिसांना खालील मुद्देमाल मिळून आला, जो जप्त करण्यात आला आहे: ३०,०००/- रुपये किमतीचा एक गावठी कट्टा (अग्निशस्त्र). ४,०००/- रुपये किमतीची एकूण ४ जिवंत काडतुसे. मोबाईल, गावठी कट्टा ठेवण्याचे लेटर पाऊच आणि काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या. गुन्ह्यात वापरलेली विना नंबरची मोटारसायकल. एकूण जप्त मुद्देमाल: २,०४,६००/- रुपये. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाई आणि अटकेसाठी राहुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, राहुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सदर धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्माका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोउपनि. संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, बाळासाहेब गुंजाळ, विशाल तनपुरे आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.







