ठाणे – कल्याणचा कुख्यात गुंड तथा मटका किंग मुनिया उर्फ जिग्नेश ठक्कर याला गोळ्या झाडून ठार मारून पसार झालेले चारही मारेकरी सोबत आणलेल्या वाहनातून गुजरातच्या दिशेने पळाले असावेत असा अंदाज व्यक्त करणारे वृत्त दैनिक पुढारीने व्यक्त केले होते. पुढारीचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुनियाला गोळ्या घालणार्या शूटरला गुजरातमधून उचलले असून त्याच्या सोबत असलेल्या अन्य दोघा संशयितांनाही कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जयपाल उर्फ जापान भानसिंग डुलगज (40) असे या शूटरचे नाव असून तो मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्पमध्ये असलेल्या समेसिंग सरतवाल यांच्या खोलीत राहणारा आहे. कल्याण रेल्वे स्थानकासमोर असलेल्या नीलम गेस्ट हाऊसच्या गल्लीत शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास मटका किंग तथा खंडणीबहाद्दर गुंड मुनिया उर्फ जिग्नेश ठक्कर याची 5 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या मुनियाचा एकेकाळचा साथीदार धर्मेश उर्फ नन्नु नितिन शहा याच्यासह त्याचा ड्रायव्हर कम बाऊन्सर जयपाल उर्फ जापान या दोघांनी मिळून केली. घटनास्थळातून पळ काढताना धर्मेश उर्फ नन्नु आणि बाऊन्सर जयपाल उर्फ जापान यांच्यासह आणखी 2 जण होते. या संदर्भात दैनिक पुढारीने 3 ऑगस्टच्या अंकात मुनियाचे मारेकरी गुजरातकडे रवाना ? या मथळ्याखाली सविस्तर वृत्त दिले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. स्थानिक पोलिस डिटेक्शन स्कॉड, डीसीपी स्पेशल स्कॉड, क्राईम ब्रँचसह एकूण 5 पथके वेगवेगळ्या दिशांना मुनियाच्या मारेकर्यांचा माग काढत होते. खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख तथा वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे व त्यांच्या पथकाने अहमदाबादमधील नारोडा सर्कलवर सापळा लावून मुख्य आरोपी धर्मेश उर्फ नन्नु याचा बाऊन्सर तथा ड्रायव्हर जयपाल उर्फ जापान डुलगज याच्यासह तिघांच्या नाड्या आवळल्या. चौकशीदरम्यान जयपाल उर्फ जापान याने मुनिया उर्फ जिग्नेश ठक्कर याच्यावर गोळ्या झाडल्याची कबूली दिली.







