सांगली (स्वप्निल कारेकर) – शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील 85 जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 3 महिलांसह एकूण 82 बंदींचा समावेश आहे. शिवाय कारागृह प्रशासनातील तिघांचाही यात समावेश आहे. सोमवारी कारागृह प्रशासनास हा अहवाल प्राप्त झाला. दरम्यान, कोरोनाबाधित सर्व बंदींना उत्तर शिवाजीनगर येथील एका महाविद्यालयातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात जिल्हा कारागृह आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर नव्याने येणार्या बंदींसाठी कारागृहाशेजारी असलेल्या एका शाळेत ठेवण्यात आले होते. काही बंदींना त्रास होत असल्याने तीन दिवसांपूर्वी मिरजेतील शासकीय रुग्णालयाच्या एका वैद्यकीय पथकाने कारागृहातील बंदींची कोरोना चाचणी केली होती.त्याचा अहवाल सोमवारी सकाळी कारागृह प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामध्ये तीन महिलांसह तब्बल 63 बंद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान सोमवारी रात्री उशिरा कारागृहातील आणखी अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये आणखी 22 जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कारागृहातील एकूण 85 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचे कामकाज बंद आहे. त्यामुळे अनेकांच्या जामीन अर्जावरील सुनावणी प्रलंबित आहे. त्यातच बंद्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आता कारागृहात कोरोनाचा सामुहिक संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सोमवारी 63 बंद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, शहरचे पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी कारागृहाला भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर बाधित रूग्णांना उत्तर शिवाजीनगर येथील एका महाविद्यालयात हलवण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार बाधित बंद्यांना तेथे हलवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.







