हिंजवडीच्या राम मंदिरात उद्या खिरापत वाटप

भंगार वेचणाऱ्या बाळू मावशींचा उपक्रम   
पुणे (अजय पवार) – अयोध्येत राम मंदिराचे भूमी पूजन होत असल्याच्या आनंदात भंगारमालाच्या व्यवसायातील उद्योजक असलेल्या बाळू मावशी धुमाळ त्यांच्या  माण-हिंजवडी-गवारवाडी  खिंडीतील राम मंदिरात ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता खिरापत वाटणार आहेत. वारकरी संप्रदायातील बाळू मावशीनी याच  वर्षी २६ फेब्रुवारी २०२० रोजी राम मंदिर उभारून तेथे राम लक्ष्मण – सीतेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती.
अशिक्षित असूनही श्रद्धेपोटी त्यांनी व्यवसायातून जमवलेली पुंजी खर्च करून हे मंदिर बांधले आणि साधू संताना बोलावून प्रतिष्ठापनेचा भव्य कार्यक्रम केला होता. या मंदिरासाठी जयपूर वरून मूर्ती आणण्यात आल्या होत्या .करवीर पिठाच्या शंकराचार्यांनी या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती .
रामावर विशेष श्रद्धा असलेल्या बाळू मावशी यांनी अयोध्येतील विवादास्पद भूमीचा निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला म्हणून आजारी असतानाही आनंदोत्सव साजरा केला होता .त्या वेळी डोळ्यांवर ३ शस्त्रक्रिया झाल्या होत्या ,अशी आठवण बाळू मावशी धुमाळ यांनी सांगितली .
५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचे भूमी पूजन होत असल्याने हा आनंद व्यक्त करण्यासाठी त्या साखर -खोबऱ्याची खिरापत वाटून परिसरातील भाविकांचे तोंड गोड करणार आहेत. ‘कोरोना मुळे मंदिर बंद असले तरी साफ सफाई ,स्वच्छतेसाठी तेथे जावे लागते . वीज नसली तरी जनरेटर लावून पाण्याची व्यवस्था करावी लागते . एकदा मंदिर उभारले की त्याची काळजी महामारी असली तरी घ्यावी लागते . श्रद्धेने आलेली ती जबाबदारी आहे . त्यात मी कमी पडत नाही . कोरोना काळातही माझ्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांसाठी काम करीत असते. ‘,अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या .
सत्तरी ओलांडलेल्या बाळू मावशी यांनी विठ्ठल मंदिर देखील उभारले असून दर वर्षी तेथे हरिनाम सप्ताह करतात . स्वखर्चाने या परिसरातील दिंडी त्या हरिद्वार ,काशीला घेऊन गेल्या आहेत. त्या अयोद्ध्येला ६ वेळा जाऊन आल्या आहेत .राम मंदिर बांधकाम  सुरु झाल्यावर परवानगी घेवून त्या अयोध्येला जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here