हस्ती बँकेची फेज-२ अंतर्गत नेट बँकींग सुरु करण्यासाठी रिजर्व बँकेकडे मागणी
दोंडाईचा (प्रतिनिधी) : दोंडाईचा येथे मुख्यालय असलेल्या व राज्यभर कार्यविस्तारासोबत नावलौकिक प्राप्त, उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दि हस्ती को-ऑप बँकेला, अविज पब्लिकेशन व गँलक्सी इनमा या बँकिग क्षेत्रातील नावाजलेल्या संस्थेतर्फे संपूर्ण भारतातून नागरी सहकारी बँकांना दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा ‘ बँको ब्लू रिबन – टेक्नॉलॉजी २०२० ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदरचा पुरस्कार वितरण सोहळा दि. १ सप्टेंबर २०२१ रोजी – म्हैसुर – कर्नाटक येथे स्थानिक खासदार मा.श्री. प्रतापसिम्हा यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी अविजचे संपादक अविनाश शिंत्रे व नाईक हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी
हस्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरिया, सरव्यवस्थापक माधव बोधवाणी तसेच ज्येष्ठ शाखा व्यवस्थापक नाना कागणे यांनी हा पुरस्कार स्विकारला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातील प्रतिनिधी उपस्थित होते.
हा पुरस्कार रू.७५० कोटी ते १००० कोटी पर्यंत ठेवी विभागात असलेल्या बँक गटातून हस्ती बँकेस – राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा ‘ बँको ब्लू रिबन – टेक्नॉलॉजी २०२० चा पुरस्कार ‘ प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ निवड समितीने केलेल्या मुल्यांकनाच्या आधारावर हस्ती बँक देशभरात सर्वोत्कृष्ट टेक्नॉलॉजीचा वापर करणारी बँक ठरली आहे. दरवर्षी सहकारी बँकिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या सभासद नागरी सहकारी बँकाच्या कार्याची दखल घेऊन अविज पब्लिकेशन व गँलक्सी इनमा ही संस्था बँको ब्ल्यू रिबन पुरस्काराने सन्मानीत करीत असते.
सन १९९६ पासून दि हस्ती को – ऑप. बँकेने अद्ययावत टेक्नॉलॉजीचा स्विकार; बँकेचे प्रमुख मार्गदर्शक व प्रगतीचे शिल्पकार आदरणीय स्व. कांतीलालजी जैन यांचे मार्गदर्शनानुसार सुरूवात केली. बँकिंग क्षेत्रात जे काही नवीन अद्ययावत व आवश्यक तंत्रज्ञान असेल; त्यानुसार तंत्रज्ञान बँकेने स्विकारण्याचे धोरण अवलंबिले. आज बँकेच्या तंत्रज्ञानात सर्व प्रकारच्या डिजीटल बँकिंग सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
यात प्रामुख्याने आरटीजीएस सेवा, बँकेच्या स्वत:च्या प्लॅटफॉर्म वरून उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे युपीआय, मोबाईल बँकिंग, नॅच अंतर्गत सर्व प्रकारच्या सेवा, एटीएम व डेबिट कार्ड सुविधा, बीबीपीएस अंतर्गत सर्व प्रकारचे बील पेमेंटसची सुविधा, सीटीएस क्लिअरिंग, ई – कुबेर अन्वये रिजर्व बँकेस पाठवायचे फंडस् अशा या सर्व सेवा बँकेने डायरेक्ट मेंबर म्हणून कार्यान्वीत केलेल्या आहेत. बँकेने ग्राहकांना बँकिंग कामकाज वेळेत व बँक कामकाज वेळेनंतर खात्यात रोख रक्कम भरण्यासाठी सीडीएम मशीन आपल्या ११ शाखांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. तसेच नेट बँकिंग फेज – १ अंतर्गत सुविधाही सुरू आहेत. यात ग्राहकांना आपल्या खात्याचा रिव्ह्यु घेणे, खाते उतारा घेणे, चेक बुक प्राप्त करणे अशा सुविधा उपलब्ध आहेत. सोबतच फेज – २ अंतर्गत नेट बँकिंगसाठी हस्ती बँकेने रिजर्व बँकेस प्रस्ताव सादर केलेला आहे. यास लवकरच मान्यताही मिळणार आहे. सदरच्या सेवा सुरक्षित व कार्यान्वयीत ठेवण्यासाठी बँकेने अद्ययावत तंत्रज्ञान तथा अधिकारी व कर्मचारी वर्ग नेमलेला आहे.
हस्ती बँक प्रेसिडेंट कैलास जैन, व्हा. प्रेसिडेंट पहलाज माखिजा, जेष्ठ संचालक मदनभाऊ जैन, किशोर जैन तथा सर्व सहकारी संचालक, समिती सदस्य या सर्वांचे मार्गदर्शनाखाली हस्ती बँक सातत्याने ग्राहकांना विविध प्रकारच्या तंत्रज्ञान आधारीत व इतर पारंपारिक बँकिंग सेवा सुरक्षितरित्या उपलब्ध करून देत आहे.
हस्ती बँकेच्या अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी बँकेचे ईडीपी विभागाचे असि. जनरल मॅनेजर सुनिल गर्गे, सुहास भावसार, किशोर सोनवणे याशिवाय अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य मिळत आहे. वरील कार्याची दखल घेत हस्ती बँकेला राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा ‘ बँको ब्लू रिबन – टेक्नॉलॉजी २०२० ‘ ह्या पुरस्काराचा सन्मान प्राप्त झाला. याकारणास्तव सर्व संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी व कर्मचारी वर्गाने आनंद व्यक्त केला.



