काबुल : पंजशीर खोरे ताब्यात घेतल्याचा दावा केल्यानंतर तालिबान्यांनी काबुलमध्ये जल्लोषात गोळीबार केला. मात्र, त्यात लहान मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाला असून, ४१ जण जखमी झाले. तर पंजशीर खोऱ्यातील विरोधी गटाने तालिबानचा दावा फेटाळला आहे.
संपूर्ण अफगाणिस्तानवर आता तालिबानचे नियंत्रण असून, पंजशीर खोऱ्यातील विरोधकांना पराभूत करण्यात आले आहे, असे तालिबानी कमांडर्सनी सांगितले होते. नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तानचा पराभव केल्याच्या दाव्यानंतर काबुलमध्ये तालिबान्यांनी मोठा जल्लोष केला. त्या वेळी केलेल्या जोरदार गोळीबारात १७ जणांचा मृत्यू झाला. त्यात अनेक लहान मुलांचा समावेश असून, ४१ जण जखमी झाले आहेत.
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या प्रकारानंतर एकच गोंधळ उडाला. घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात अनेक जण जखमी नातेवाइकांना घेऊन रुग्णालयात नेताना दिसतात. गोळीबारानंतर परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
तालिबानचा काबुलमध्ये जल्लोष सुरू असताना पंजशीर खोऱ्यातील विरोधी गटाने तालिबानचा दावा फेटाळला. उलट तालिबानच्या अनेक जणांना ठार केल्याचे विरोधी गटाचे प्रमुख अहमद मसूदने म्हटले आहे. पाकिस्तानी माध्यमे हे खोटे वृत्त पसरवित असल्याचे मसूदने स्पष्ट केले. दरम्यान, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझई यांनी तालिबान आणि पंजशीरमधील विरोधी गटाला चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.






