अनैतिक संबंधांच्या संशयातून डॉक्टर पत्नीला ठार करून तलाठी पती फरार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : पिंपरी चिंचवडमध्ये संशयावरून तलाठी पतीने डॉक्टर पत्नीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. विजयकुमार साळवे असं आरोपीचं नाव असून तो जुन्नर तालुक्यातील आळेगावमध्ये तलाठी म्हणून कार्यरत आहे. तर सरला विजय साळवे असं मृत महिलेचं नाव आहे. सरला साळवे या पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. तसेच मोशीत त्याचं खाजगी रुग्णालय देखील होतं.

दरम्यान नायडू हॉस्पीटलमधल्या डॉक्टरशी पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय विजयकुमारला होता. या संशयावरुनच विजयकुमारने पत्नी सरलाची हत्या केली. विजयकुमार आणि सरला यांनी नुकताच मोशीमध्ये फ्लॅट घेतला होता. या नवीन फ्लॅटची शनिवारी वास्तूशांती केली. त्यानंतर दोघंही फ्लॅट मध्ये मुक्कामी होते. रविवारी दोघांचे फोन बंद होते. त्यामुळे नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी नव्या फ्लॅटचं कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यावेळी डॉक्टर सरला यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळला.

सरला यांच्या मृतदेहाजवळ लोखंडी हातोडा आणि चाकू देखील आढळून आला. फरार होण्यापूर्वी पतीने लिहलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली असून पत्नी मला साथ देत नसल्याचं यात लिहलं होतं. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here