गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना घेऊन मुंबईहून रवाना झाली ‘मोदी एक्सप्रेस’

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या १८०० चाकरमान्यांना घेऊन ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना झाली आहे. या ट्रेनला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप आमदार नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवला.

ही ट्रेन दादर स्थानकावरुन सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली आहे. या ट्रेनमधील प्रवाशांनी गणपतीची आरती म्हणत प्रवासाला सुरुवात केल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नितेश राणेंनी या ट्रेनसंदर्भात काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती.

आज या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याआधीचे काही फोटो नितेश राणेंनी ट्विटरवरुन पोस्ट केलेत. यामध्ये गाडीवर ‘मोदी एक्सप्रेस’ विशेष ट्रेन असे स्ट्रीकर लावल्याचे दिसत आहे. मोदीजींच्या संकल्पनेतून २२५ ट्रेन आम्ही कोकणवासीयांसाठी सोडल्या आहेत. महाराष्ट्रात गणपती उत्सव अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. आता ही रेल्वे कोकणात जाणार आहेत. या रेल्वेमुळे कोकणवासी खूश असल्याचे मत यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.

मोठ्या उत्साहामध्ये या गाडीमधील गणेशभक्तांनी या सेवेबद्दल आनंद व्यक्त करताना गणरायाची आरती गात प्रवासाला सुरुवात केली. मुंबई ते सावंतवाडी या प्रवासात मोदी एक्सप्रेसमध्ये सर्व प्रवाशांना एक वेळचे जेवणदेखील दिले जाणार असल्याचे याआधीच सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here