हिस्सार (हरियाणा) : जिल्ह्यात एका सात वर्षाच्या मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला आहे. सर्व आरोपी पीडित मुलीचे नातेवाईक असल्याचे समजते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, घरी कोणी नसताना एका सात वर्षाच्या मुलीला तीन मुलांनी बांधून ठेवले. या तीन मुलांचे वय १४ ते १६ दरम्यान असून नात्याने ते मुलीचे काका लागतात. त्यांनी मुलीला बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नंतर या आरोपींनी मुलीला जखमी अवस्थेत सोडले आणि तिथून पळ काढला. जेव्हा पीडित मुलीची आई घरी पोहोचली तेव्हा मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. आईने तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले.
मुलीची प्रकृती इतकी खालावली होती, की तीन दिवस ती बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. अखेर ती शुद्धीवर आली आणि तिने झालेली घटना सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.






