महिला पोलीस कॉन्स्टेबलनेच दिली सहकारी पोलिसाच्या हत्येची सुपारी

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या महिला पोलीस कान्स्टेबलने सुपारी देऊन सहकारी पोलीस शिपायाची हत्या केल्याने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. अंगावर नॅनो गाडी घालून हत्या करत तो अपघात असल्याचे आरोपींनी फासवले होते. मात्र पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक बाबींचा तपास करून तीन आरोपींना अटक केली आहे.

मुंबई पोलीसात कॉन्स्टेबल असलेल्या शिवाजी सानप यांचा १५ ऑगस्ट रोजी अपघातात मृत्यू झाला होता. मात्र हा अपघाती मृत्यू संशयास्पद वाटल्याने पनवेल शहर पोलिसांनी तपास सुरूच ठेवला. पनवेल रेल्वे स्थानकात उतरून पनवेल बस डेपोकडे जाताना संध्याकाळी अंधाराचा फायदा घेत दोन आरोपींनी सानप यांना मागून धडक देत गंभीर जखमी केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एका नॅनो गाडीने मागून येऊन शिवाजी सानप यांना उडवले.

त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तीन दिवसानंतर शिवाजी सानप यांचा मृत्यू झाला. वापरलेल्या नॅनो गाडीला नंबर प्लेट नव्हती. तसेच घटनेनंतर आरोपींनी तरघर येथील निर्जनस्थळी पुरावा नष्ट करण्यासाठी नॅनो जाळली होती. यामुळे नवी मुंबई, पनवेलमधील सीसीटीव्ही शोधून सर्व गल्ली बोळ शोधूनही पिवळ्या रंगाची नॅनो सापडली नव्हती. तपासात अनेक नॅनो गाड्यांच्या मालकांची चौकशी करण्यात आली, मात्र ठोस काही हाती लागत नव्हते.

पनवेल शहर पोलिसांनी तपासाची चक्रे मुंबईतून फिरवली. शिवाजी सानप यांनी प्रवास केलेल्या कुर्ला ते पनवेल रेल्वे स्थानकातील सर्व सीसीटीव्ही तपासले. यामध्ये दोन संशयित इसम शिवाजी सानप यांचा पाठलाग करत असल्याचे समोर आले. सीसीटीव्हीवरून दोन आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले गेले असता खरी हकीकत समोर आली. या हत्येमागे मुंबई पोलीसात काम करणाऱ्या शिपाई शितल पानसरे यांचा हात असल्याचे समोर आले. या हत्येची सुपारी दिल्याचे त्यांनी कबूल केले.

मयत शिवाजी सानप व शितल पानसरे हे मुंबईतील नेहरू नगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना दोघांमध्ये वादावादी झाली होती. यानंतर २०१९ रोजी सीबीडी आणि कल्याण पोलीस ठाण्यात शितल पानसरेने शिवाजी सानप यांच्यावर विनयंभग, बलात्कार, मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल केले होते. मात्र यानंतरही कायमचा बदला घेण्यासाठी शितल पानसरेने या हत्येचा कट रचला. उलवे येथे राहणाऱ्या सोसायटी मधील वॉचमन विशाल जाधव आणि गणेश चव्हाण यांना हत्येची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी आरोपी शितल पानसरे, विशाल जाधव व गणेश चव्हाण या तीनही आरोपींना अटक केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here