पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : सामूहिक बलात्काराच्या घटनेतून पुणे शहर सावरलं नसतानाच गुरुवारी पहाटे एका रिक्षा चालकाने सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तीच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नराधम रिक्षाचालकाला काही तासातच बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पुणे स्टेशन बस स्थानकालगत मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहते. पहाटे मुलगी आईच्या कुशित झोपली असताना रिक्षाचालकानं तिला उचलून रिक्षात ठेवलं. यानंतर रिक्षा थेट मार्केटयार्ड येथील एका पडीत इमारतीजवळ नेली. तेथे इमारतीच्या वरच्या मजल्यावर तिला नेऊन बलात्कार केला.
दरम्यान, घरच्यांना जाग आल्यावर मुलगी कुशीत नसल्याचे दिसले. त्यांनी सुरवातीला आजूबाजूला शोध घेतला. मात्र ती मिळून न आल्याने त्यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनीही नुकत्याच घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसर पिंजून काढला तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत त्याला मार्केटयार्ड परिसरात जेरबंद केले. यानंतर पिडीत मुलीला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले आहे.






