संगमेश्वर (प्रतिनिधी) : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवास करणे कठीण झाले असताना संगमेश्वरला असलेल्या ब्रिटिशकालीन सोनवी पुलाची खड्ड्यांमुळे दूरवस्था झाली आहे. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. या पुलावरून प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
अत्यंत धोकादायक असलेल्या या पुलाशेजारी नवा पूल उभारण्याचे काम सुरु आहे. मात्र, जुन्या पुलावरील खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या पूलाची दूरवस्था झाली असून त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. पुलाच्या दुरुस्तीकडे ठेकेदार किंवा राष्ट्रीय महामार्ग विभाग लक्ष देत नसल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे हाल होत आहेत.
गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक वाढली आहे . परिणामी असंख्य खड्डे पडून धोकादायक बनलेल्या संगमेश्वर येथील सोनवी पूलावरुन एकेरी वाहतूक सुरु ठेवल्याने मोठी वाहतूक कोंडी होत दोन्ही बाजूस वाहनांच्या दोन किमी लांबीच्या रांगा लागत होत्या. ब्रिटीश काळात उभारलेल्या सोनवी पूलाला ८४ वर्षे झाली आहेत. सद्यस्थितीत पूलाची अवस्था धोकादायक असताना बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे.






