शेतकरी आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्याने दिल्लीत तणाव

नवी दिल्ली : विरोधाला झुगारून मोदी सरकारकडून संख्येच्या बळावर संसदेत नवे कृषी कायदे संमत करून घेण्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालंय. परंतु, राजधानी दिल्लीच्या सीमेवर अजूनही शेतकरी कृषी कायद्यांविरुद्ध ‘काळा दिवस’ पाळताना दिसत आहेत. शिरोमणि अकाली दलाच्या नेतृत्वाखाली आज संसदेपर्यंत एका मार्चचं आयोजन करण्यात आलंय. दिल्ली पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग उभारत रस्ते बंद करून आंदोलकांचा मार्ग रोखून धरलाय. कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना मार्चची परवानगी नाकारण्यात येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आलंय. आंदोलकांनी पोलिसांची ही कारवाई ‘अघोषित आणीबाणी’ असल्याचं म्हटलंय.

गुरुद्वारा रकाब गंज साहीब परिसरातून आज शिरोमणी अकाली दलाच्या मार्चला सुरूवात होणार आहे. मात्र, या भागाला घेराव घालत पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी यासंबंधी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं पंडित श्रीराम शर्मा आणि बहादूरगड सिटी मेट्रो स्टेशनचा आत आणि बाहेर जाण्याचा मार्ग बंद केला आहे. दिल्लीत अनेक मार्ग बंद करण्यात आल्यानं रस्त्यांवर रहदारीच्या रुपानं त्याचे परिणाम दिसून येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग ९ आणि राष्ट्रीय महामार्ग २४ वर मोठ्या प्रमाणात ट्राफिक दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here