मुंगेली (छत्तीसगड) : जिल्ह्यात शुक्रवारी एका नवविवाहितेच्या खूनाची घटना समोर आली आहे. लग्नात हुंडा दिला नाही म्हणून तरुणीचा खून करण्यात आला. हुंड्यात बाईक देण्यावरुन नवविवाहित दाम्पत्यांमध्ये वाद सुरू होता. हे प्रकरण इतकं वाढलं की, तरुणाने पत्नीचा गळा दाबून तिचा खून केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंघनपुरी गावात राहणारा राहुल साहू याचं लग्न ७ महिन्यांपूर्वी कवर्धा जिल्ह्यातील पुसेरा गावातील आरतीसोबत झालं होतं. दोघांमध्ये सुरुवातील सर्व ठीक सुरू होतं. मात्र काही दिवसांनंतर राहुल आरतीला हुंड्यासाठी त्रास देऊ लागला. राहुल आरतीच्या सासरच्या मंडळींकडून बाईकची मागणी करू लागला. यावरुन पती-पत्नींमध्ये वारंवार वाद सुरू होता.राहुल आरतीला वारंवार मारहाण करू लागला. याबाबत आरतीने कुटुंबीयांना कळवलं. यादरम्यान १५ सप्टेंबर रोजी राहुलने आरतीचा खून केला.
अंत्यसंस्कारापूर्वी आरतीच्या कुटुंबीयांनी तिचं शरीर तपासलं. तेव्हा आरतीच्या गळ्याभोवती मारहाणीच्या खुमा दिसल्या. यावरुन आरतीचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना बोलावलं. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तर आरोपीनेही हत्येची कबुली दिली आहे.






