ब्यूनस आयर्स (अर्जेंटिना) : येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणात एक पोपट मुख्य साक्षीदार ठरला आहे. कोर्टात पोपटाची साक्षदेखील घेण्यात आली आणि त्याच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवलं जाऊ शकतं.
मिळालेल्या माहितीनुसार, ४६ वर्षीय एलिजाबेथ टोलेडो हिच्यावर बलात्कार केल्यानंतर हत्या करण्यात आली होती. ज्या वेळी ही घटना घडली, महिलेचा पोपट तिथेच होता. त्याने महिलेवर घडलेला प्रकार पाहिला होता. त्यामुळे वकिलांनी पोपटालाच मुख्य साक्षीदार म्हणून कोर्टासमोर हजर केलं.
‘द सन’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, एलिजाबेथ टोलेडो ही आणखी दोघांसह भाड्याच्या घरात राहते. पोलिसांना महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरात मिळाला. तिच्यासोबत राहणाऱ्या दोघांनी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र चौकशीदरम्यान फार काही हाती लागू शकलं नाही.
मात्र पोपटाच्या साक्षीनंतर प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.अर्जेंटिनाच्या सॅन इसिड्रो कोर्टात पोलिसांनी पोपट काहीतरी म्हणत असल्याचं सांगितलं. ‘नको प्लीज नको..मला जाऊ द्या. तुम्ही मला का मारताय?’ असं पोपट म्हणत होता. शेजारच्यांनीदेखील महिलेच्या तोंडून असे शब्द ऐकल्याचं समोर आलं.
एलिजाबेथ टोलेडो मृत्यूपूर्वी आरोपींना असंच काहीसं म्हणाली असेल. जे पोपटाने ऐकलं व लक्षात ठेवलं. पोलिसांनी ५३ वर्षीय मिगुएल रोलन आणि ६५ वर्षीय जॉर्ज अल्वारेज़ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जर हे दोघे दोषी असल्याचं समोर आलं तर त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. पोपटाच्या साक्षीव्यतिरिक्त पोलिसांनी मृत महिलेच्या डीएनए रिपोर्टवरुन काही महत्त्वपूर्ण पुरावे सापडले आहेत. टोलेडो हिच्यावर २०१८ डिसेंबरमध्ये बलात्कार आणि त्यानंतर हत्या करण्यात आली होती.






