उल्हासनगर येथे टोळक्याकडून गुंडाची भर रस्त्यात दिवसाढवळ्या हत्या

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : जिल्ह्यातील उल्हासनगरात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराची दिवसाढवळ्या भररस्त्यात धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या करण्यात आलीय. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या २ तासात पाचही मारेकऱ्यांना बेड्या ठोकत गजाआड केलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुशांत गायकवाड उर्फ गुड्या हा शुक्रवारी (१७ सप्टेंबर) दुपारी २ वाजेच्या सुमारास उल्हासनगरच्या नेताजी चौकात काही मित्रांसह उभा होता. यावेळी तिथे आलेल्या एका टोळक्यानं त्याच्यावर चाकू, कोयता आणि रॉडने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सुशांत हा काही काळ रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडला होता.

या घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मारेकऱ्यांचा शोध सुरु केला.

ullasnagar-police-arrested

सुशांत याचा पूर्वीचा मित्र आणि त्याच्यासोबत ३ गुन्ह्यांमध्ये सहआरोपी असलेल्या आकाश शिंदे उर्फ चिंट्या याच्याशी सुशांत याचे काही दिवसांपासून वाद सुरु होते. त्यातच शुक्रवारी सकाळच्या सुमारास आकाश शिंदे याच्या आईने सुशांतच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली होती. त्यामुळे आकाश याचा शोध घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपणच ही हत्या केल्याची कबुली दिली.

आरोपी आकाशने आपला गुन्हा कबूल केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २ तासात अमोल मोरे उर्फ वांग्या, आकाश खडसे, यश रुपवते आणि अवी थोरात या आणखी 4 मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या. या घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या सुशांत याच्यावर 7 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here