नाशिक शहरात वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोघांची आत्महत्या

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून शुक्रवारी (दि.१७) वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोघांनी आत्महत्या केली. त्यात ६९ वर्षीय वृध्दासह ३२ वर्षीय तरूणाचा समावेश आहे. दोघांच्याही नैराश्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार भास्कर भिमा धोंडगे (रा.रेणूका रो हाऊस,नरहरीनगर पाथर्डी फाटा) यांनी शुक्रवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून आड्याच्या लोखंडी अ‍ँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत घोषीत केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.

दुसरी घटना विहीतगाव येथे घडली. श्रीराम भिकाजी भोर (३२ रा.रंगोली सोसा.विहीतगाव) या तरूणाने गुरूवारी (दि.१६) मध्यरात्री आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही घटना निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here