ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये गेल्या आठवड्यभरापासून खूनाचे सत्र सुरूच आहे. आजही हेडफोन न दिल्याचा राग आल्याच्या क्षुल्लक कारणावरून मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर सोनवणे या तरुणाची त्याचाच मित्र शिवड्या उर्फ सुरेश शिंदे यांनी चाकू भोसकून हत्या केली आहे. शुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर, आरोपी सुरेश आणि त्यांचे मित्र एकत्र दारू पीत बसले होते. याच वेळी आरोपी सुरेश याने ज्ञानेश्वरच्या नकळत त्याचा हेडफोन आणि मोबाईल स्वतःजवळ ठेवला.
तो परत देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी ज्ञानेश्वरने आपल्याकडे असलेला चाकू आरोपी सुरेशवर उगारला. मात्र सुरेशने हाताला झटका देत तो चाकू जमिनीवर पाडला आणि त्याच चाकूने ज्ञानेश्वरला भोसकून त्याची हत्या केली. ज्ञानेश्वरची हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर पॅरोलवर सुटलेल्या आरोपी सुरेश शिंदे याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्र फिरवली आणि आरोपी सुरेश शिंदेला अवघ्या १२ तासात अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी सुरेशवर या पूर्वी देखील गुन्हे दाखल असून तो कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर आहे. पॅरोलवर बाहेर आल्यानंतर आपल्या मित्रांसोबत दारू पार्टी करत असताना ही घटना घडली. दरम्यान, अवघ्या २४ तासात उल्हासनगर शहरात दुसरी हत्या झाल्याने पोलिसांना इथल्या गुंडांना जरप बसवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.






