पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : अल्पवयीन मुलीला मदत करण्याचा बहाणा करत तिचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांनी देखील मुलीवर बलात्कार केल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी या सर्व घडलेल्या प्रकाराचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले आहे. हे चित्रीकरण नेमके कोणी केले ? याचा तपास पोलिसांनी जारी केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी १९ जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले दोघेजण हॉटेल व्यवसायिक आहे. मेहबूब बादशहा शेख (वय २७, रा. सुरक्षानगर, वैदवाडी हडपसर) आणि इस्माईल लतीफ शख (वय ३६, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच अशोक कल्याण चव्हाण (वय ३२, रा . शिवाजीनगर) आणि राजेश विठ्ठलराव मिसाळ (वय ४१, रा. साठे वस्ती लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्या लॉजच्या व्यवस्थापकांची नावे आहेत.
चव्हाण याने लॉजच्या रजिस्टरमध्ये नोंद न करताच मुलगी आणि आरोपीला खोली भाड्याने दिली. तर मिसाळ याने लॉजच्या रजिस्टरमध्ये पीडित मुलीचे चुकीचे नाव व वय नोंदवले. त्यांनाही अटक केली आहे. वानवडी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी या गुन्ह्याचा तपास करत आहे.






