पतीला निलंबित केल्याने पत्नीने घातला थेट जिल्हा परिषद सीईओंच्या दालनात राडा

सातारा (प्रतिनिधी) : एका औषध निर्माण अधिकाऱ्याला निलंबित केल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात चांगलाच राडा केला. जिल्हा परिषद सदस्य आणि नागरिकांच्या आलेल्या तक्रारीवरुन प्रशासनाने औषध निर्माण अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं. मात्र पत्नीच्या गोंधळामुळे जिल्हा परिषदेत तणाव निर्माण झाला होता.

संबधित औषध निर्माण अधिकारी हा कोरेगाव तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होता. कर्मचाऱ्यांबाबत जिल्हा परिषद सदस्य व नागरिकांच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आल्या होत्या. यावरुन आरोग्य विभागाकडून औषध निर्माण अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. मात्र, या निलंबनाचाच जाब विचारण्यासाठी अधिका-याच्या पत्नीने थेट जिल्हा परिषद गाठली. यावेळी त्या महिलेनं सीईओं विनय गौडा यांच्या दालनात पतीच्या निलंबनावरुन चांगलाच गोंधळ घातला.

सीईओंच्या दालनातच त्या महिलेनं अनेक प्रश्न केले आहेत. दरम्यान राडा करतेवेळी त्या महिलेस शांत राहण्याची सूचना जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी केली परंतु, ती महिला शांत रहाण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हती. अखेरीस तेथील सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. नंतर तातडीने महिला पोलिसांनी जिल्हा परिषदेत धाव घेतली. दरम्यान, सीईओं विनय गौडा यांनी त्या महिलेला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेवून तुमची तक्रार देण्यास सांगितले. तरीही महिलेनं ऐकलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here