हाथरस (उत्तरप्रदेश) : देशभरात गाजलेल्या हाथरस येथील पिडीतेवरील पाशवी अत्याचाराच्या घटनेला वर्ष उलटून गेले असले तरी या पिडीतेच्या कुटुंबियांच्या नरकयातना अजून संपलेल्या नाहीत. कारण त्यांचा गुन्हा एकच आहे, तो म्हणजे त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल समाजव्यवस्थेकडे न्याय मागितला.
या नरकयातनांबाबत बोलतांना पिडीतेच्या वडीलांनी सांगितले की, ‘गावात कोणी बोलत नाही, कोणी भेटायला येत नाही, आम्ही जेव्हा सुनावणीसाठी न्यायालयात जातो तेव्हा आम्हाला उद्देशून टोमणे मारले जातात. मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवून, न्याय मागून मी गुन्हा केला असल्यासारखीच वागणूक दिली जातीये.’
सरकारने पिडीतेच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची रक्कम भरपाई म्हणून दिली आहे. मात्र न्यायालयात खटला लांबला तर ही रक्कम आणखी किती दिवस पुरणार असा प्रश्न गेल्या वर्षभरापासून रोजगार गमावलेल्या पिडीतेच्या वडिलांना सतावतोय. बलात्काराच्या घटनेनंतर गावकऱ्यांनी पिडीतेच्या कुटुंबियांना वाळीत टाकले आहे. अनेक जण त्यांच्या घरासमोर शेण, उष्टे अन्न, कचरा टाकून त्यांना सतावत आहेत. कुटुंबियांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या सीआरपीएफ अधिकाऱ्याने आपल्याला यापूर्वी कधीही एखाद्या कुटुंबाचे त्यांच्याच शेजाऱ्यांकडून संरक्षण करण्यासाठी तैनात केले गेले नव्हते असे सांगितले.
सीआरपीएफ अधिकारी नाव न छापण्याच्या अटीवर सांगतात, की ‘इतर गावकरी पिडीतेच्या घराबाहेर कचरा टाकतात, पाऊस पडल्यास सर्वत्र दुर्गंध पसरते. केवळ दुर्गंधच नव्हे तर या घाणीतून आजार होण्याचाही धोका आहे.’
पिडीतेच्या धाकट्या भावाने सांगितले की, ‘घरातील देवी देवतांचे पोस्टर्स जीर्ण झाल्यानंतर आम्ही ते काढून टाकले. तसंही आम्हाला हिंदू म्हणवलं जात नाही. कुटुंबातील सर्वांना रोजगार गमवावा लागला आहे. गेल्या वर्षभरापासून घरात ठेवलेला माझ्या बहिणीच्या अस्थिकलशाकडे पाहून मनात प्रश्न निर्माण होत की हे सर्व इतकं वाईट आपल्या वाट्याला यावं असा आपण कोणता गुन्हा केलाय?’






