पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : जिल्ह्यातील दौंड येथील भीमा नदीपात्रात शनिवारी (दि.१८) सकाळी अकराच्या सुमारास अंघोळ करण्यासाठी नदी पात्रात उतरलेल्या दोन तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. बुडालेल्या तरुणांचे मृतदेह तीन तासानंतर हाती लागले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी नदी तीरावर मोठी गर्दी केली होती.
आवेश मुजफ्फर शेख (वय-१३) आणि त्याचा सहकारी आदिल मेहबूब शेख (वय-१८) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. आवेश आणि आदिल हे आज सकाळी अकराच्या सुमारास भीमा नदीमध्ये अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले.परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. दोन तरुण पाण्यात बुडत असल्याचे समजल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस हवालदार सचिन बोराडे, अण्णा देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल रवी काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पोपट जाधव यांनी नदी तीरावर झालेली गर्दी बाजूला केली. नावाडी मच्छिमार यांच्या मदतीने तरुणांचा शोध घेतला.






