ढेबेवाडी पोलिसांच्या सतर्कतेने सव्वा लाखांची चोरी अवघ्या १२ तासात उघडकीस

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : पाटण तालुक्यातील करपेवाडी येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या साईट ऑफिसचे कुलूप बनावट चावीने उघडून सुमारे १ लाख १९ हजाराचा ऐवज अज्ञाताने चोरल्याची घटना घडली होता. काल ही चोरी उघडकीस आल्यानंतर ढेबेवाडी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या १२ तासात चोरीचा छडा लावत मुद्देमालासह दोघां संशयितांना अटक केली आहे. तर तिसरा संशियत अद्याप फरार आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करपेवाडी येथे महेश कोकाटे यांचे नवीन इमारती मध्ये ऑफिस आहे. ऑफिसमध्ये त्यांनी पॉली कॅब कंपनीचे वायरचे बंडल ठेवले होते. दि. १६ ते १७ सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीने ऑफिस उघडून आॅफिस मधील १ लाख १९ हजार रुपये किमतीचे पॉली कॅब कंपनीचे वायरचे ३१ बंडल चोरून नेले. ही घटना उघडकीस येताच फिर्यादीने ढेबेवाडी पोलिसात धाव घेऊन अज्ञात चोरट्यां विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत १२ तासाच्या आतच या चोरीचा छडा लावत पोलिसांनी ऋषीकेश वंसत कदम (वय- 23, रा. गुढे ता. पाटण), रोहीत मारुती जाधव (वय- 22 रा. तळमावले ता. पाटण) यांना अटक केली असून राज विजय करपे (रा.करपेचाळ- तळमावले) याचा शोध सुरू आहे.

सदर गुन्हा उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील, ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे स.पो.नि. संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय तलबार, पो.हवा. राजेंद्र घाडगे, शशिकांत खराडे, नवनाथ कुंभार यांनी उघडकीस आणला आहे. गुन्हा घडूच नये व जर घडला तर त्याचा त्वरित निपटारा करून गुन्हेगार व गुन्हेगारीला आळा घालणे यावर आमचा भर आहे. ढेबेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत असून ढेबेवाडी, पाटण घाटातील जबरी चोरी, मत्रेवाडी येथील खून अथवा गुढे येथे भांडणात अवैद्य पिस्तुल हस्तगत करणे अशा अनेक गुन्ह्याची उकल आम्ही अवघ्या काही तासात केली असल्याचे ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे स. पो. नि संतोष पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here