बीड (प्रतिनिधी) : शहरातील अंकुशनगरात भाड्याच्या घरात राहणारे व गेवराई ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस अंमलदार पोहचले शिवाजीनगर ठाण्यात तक्रार देण्यासाठी. त्यांची तक्रार होती पत्नीविरुध्द. घरातील रोकड व दागिने घेऊन पत्नी पसार झाल्याची. पोलिसांनी तक्रार दाखल केली बेपत्ता होण्याची पण अंमलदार चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत दोन दिवसापासून पोलीस ठाण्यात चकरा मारत आहेत.
याबाबत २१ सप्टेंबरला त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते २० रोजी गेवराई ठाण्यात कर्तव्यावर असतांना, घरी पत्नी होती. चुलतबंधू, तसेच सासू-सासरे यांच्याशी संगनमत करून पत्नीने रोख १ लाख ६० हजार रुपये व एक लाख रुपये किमतीची चांदी व दोन प्लॉटची कागदपत्रे घेऊन पळ काढला.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल करुन घेण्यात आला. चोरीचा गुन्हा नोंदवावा, यासाठी अंमलदार दोन दिवसांपासून ठाण्यात चकरा मारत आहे. दरम्यान, पत्नीला फोनवरून विचारणा केली असता नातेवाइकांनी फोन हिसकावून घेत जिवे मारण्याची धमकी दिली. पत्नीने हिंगोली येथून फोनवर शिवीगाळ करून धमकाविल्याचा आरोप करीत अदखलपात्र गुन्हा नोंदविला. इकडे शिवाजीनगर ठाण्यात तक्रार घेत नसल्याने या अंमलदाराने थेट उपअधीक्षक संतोष वाळके यांचे कार्यालय गाठत आपली कैफियत मांडली.






