सांगली (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : भारतीय संस्कृतीत लग्नसंस्थेला फार मोठे महत्व आहे. आयुष्याभराच्या नव्हे तर साताजन्माच्या या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. या रेशीमगाठीत बांधलेले जीव आयुष्याच्या अखेरपर्यंत एकमेकांच्या साथीने, आधारे जीवन जगतात. मात्र मिरज येथे चर्चा सुरु आहे ती एका अनोख्या लग्न सोहळ्याची. या लग्नसोहळ्यातील वधू होती ६६ वर्षांची तर वर होता ७९ वर्षाचा. आयुष्याच्या अखेरीस दोघांनाही जगण्यासाठी एकमेकांचा आधार मिळावा म्हणून झालेल्या या विवाहात महापालिकेच्या बेघर केंद्रात निराधार असणाऱ्या वृद्ध महिलेशी निवृत्त शिक्षकाने ही लग्नाची गाठ बांधली आहे.
तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंखे (वय ७९) यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होतं. त्यांना एक मुलगा आहे. पण तो त्याच्या प्रपंचात व्यस्त आहे. त्यामुळे दादासाहेब साळुंखे यांची गेल्या काही वर्षांपासून जगण्याची फरपट सुरू होती. एकाकी जगणाऱ्या साळुंखे आजोबांनी आयुष्याच्या अखेरीस कोणाचा तरी आधार आणि तोही पत्नीचा असावा, असं वाटतं होते. त्यामुळे दादासाहेब साळुंखे यांनी पुन्हा लग्न करण्याचा निश्चित केला. तशी संमती ही त्यांच्या मुलाकडून मिळवली.
वयाच्या ७९ व्या वर्षी लग्नासाठी वधू मिळणार कुठे? हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. तसंच दादासाहेब साळुंखे हे कुणी उद्योजक किंवा धनाढ्य नव्हते, त्यामुळे त्यांना वधू शोधणं हे खूप मोठं आव्हान होतं. शिवाय त्यांच्या वयाकडे बघता, समवयस्क वधू मिळणे अशक्य होतं. मात्र, दादासाहेब साळुंखे यांना मिरज महापालिकेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या बेघर केंद्राची माहिती मिळाली, ज्या ठिकाणी निराधार महिलांचा सांभाळ केला जातो आणि साळुंखे यांनी थेट आस्था बेघर महिला केंद्र गाठलं आणि तिथे त्यांना आपल्या जीवनाची सोबती सापडली. आस्था बेघर केंद्राच्या प्रमुख असणाऱ्या सुरेखा शाहीन शेख यांनी दादासाहेब साळुंखे यांच्याकडून त्यांचे विचार आणि मत जाणून घेतलं. त्यानंतर त्यांना बेघर केंद्रात असणाऱ्या शालिनी या ६६ वर्षीय महिलेची गाठ घालून दिली, दोघांचे विचार जुळले व एकमेकांचे विचार,सुख- दुःख वाटून घ्यायचा निर्णय दोघांनी घेतला. निराधार असलेल्या शालिनी आणि सोबतीची गरज असणारे दादासाहेब साळुंखे हे दोघेही विवाहबध्द झाले आहेत. आस्था बेघर केंद्रामध्ये मोठ्या आनंदात वयाची बंधने झुगारून हा अनोखा लग्नसोहळा पार पडला.
याप्रसंगी साळुंखे यांचे पैपाहुणे, बेघर केंद्रातील समदुःखी महिला यांच्या उपस्थितीत सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडलं. समाज सुधारक सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या फोटोला पुष्पहार व वृक्षाला पाणी घालून,फुलांच्या अक्षदा टाकत हा विवाह संपन्न झाला. बेघर केंद्रात राहणाऱ्या शालिनी यांच्या मनातही कधी आपल्या आयुष्यात सरत्या शेवटी पती नावाचा साथीदार मिळेल, असा विचार देखील आला नव्हता. पण दादासाहेब साळुंखे यांच्या रूपाने त्यांना सोबती मिळाला आहे. या दोघांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. आणि परंपरेने चालत आलेल्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण व कालबाह्य झालेल्या पद्धतीला फाटा देऊन केलेल्या आजी-आजोबांच्या या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.






