अथणीत दोन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले

अथणी (कर्नाटक) : येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील दोघा अधिकार्‍यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी छापा टाकला. खात्याचे सहायक अभियंता राजेंद्र इद्राप्पा परनाकर व व्यवस्थापक दीपक कृष्णाजी कुलकर्णी यांना ६८ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

जलजीवन मिशन योजनेंतर्गत काही कंत्राटी कामे पाणीपुरवठा खात्यामार्फत दिली जातात. एका कंत्राटदाराला हे काम देण्यासाठी व्यवस्थापक दीपक कुलकर्णी व सहायक अभियंता परनाकर यांनी ३ टक्के कमिशनची मागणी केली होती. या कंत्राटदाराने याबाबतची तक्रार बेळगाव एसीबीकडे केली होती. त्यानुसार सापळा रचून बुधवारी कंत्राटदार लाचेची रक्‍कम या दोघांकडे देताना एसीबीच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून लाच स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडले.

एसीबीचे एसपी बी. एस. न्यामगौडर यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक करुणाकर शेट्टी, निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, सुनीलकुमार व त्यांच्या अन्य सहकार्‍यांनी ही कारवाई केली. या दोघांना ताब्यात घेऊन रात्रीपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.

बुधवारी सकाळच्या टप्प्यात एसीबीची कारवाई झाल्याचे वृत्त संपूर्ण अथणी शहरात पसरले. त्यामुळे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सन्नाटा पसरला होता. पाणी पुरवठा खात्याच्या कार्यालयाबाहेर कंत्राटदारांनी गर्दी केली होती. कार्यालयाच्या बाजूलाच सरकारी दवाखाना असल्याने बघ्यांच्या गर्दीत अधिकच वाढ झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here