पाच कोटी घेऊनही निवडणुकीचे तिकीट न दिल्याने तेजस्वी यादव, मीसा भारतीसह पाच जणांविरोधात तक्रार दाखल

tejasvi-yadav-and-misa-bharati

पाटणा (बिहार) : आरजेडी नेता तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण मीसा भारती यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण पाच कोटी रुपये घेऊनही निवडणुकीचे तिकीट न दिल्याने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तेजस्वी यादव आणि मिसा भारती यांच्यासह पाच जणांविरोधात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

या पाच जणांविरोधात ही तक्रार पटणा सीजेएम कोर्टाच्या आदेशान्वये दाखल करण्यात आली आहे. या सर्वांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी ५ कोटी रुपये घेऊनही तिकीट दिले नसल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तेजस्वी यादव, मीसा भारती, बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते राकेश राठोर आणि अन्य एकाविरोधात तक्रार दाखल झाली आहे.

या प्रकरणी १८ ऑगस्ट रोजी संजीव कुमार सिंह यांनी पाटणा सीजेएम कोर्टामध्ये तक्रार दाखल केली होती. १५ जानेवारी २०१९ रोजी भागलपूर येथून तिकीट मिळण्याच्या आश्वासनाच्या बदल्यात आपण तेजस्वी यादव, मीसा भारती, मदन मोहन झा आणि राजेश राठोड यांना पाच कोटी रुपये दिले. मात्र आपल्याला तिकीट मिळाले नाही, असे संजीव कुमार सिंह यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते.

आपल्या तक्रारीत संजीव कुमार सिंह यांनी हेसुद्धा सांगितले की, लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट मिळू न शकल्यानंतर त्यांना २०२० च्या विधानसभा निवडणुकीत महाआघाडीकडून उमेदवारी मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र विधानसभा निवडणुकीतही तिकीट मिळाले नाही. या प्रकरणी सीजेएम विजय किशोर सिंह यांनी १६ सप्टेंबर रोजी पाटण्याचे एसएसपी उपेंद्र शर्मा यांना आदेश जारी करून सर्व आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्याचे आणि त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here