ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : डोंबिवलीतील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मनपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत २३ आरोपींना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन, तर बाकीचे सर्व १८ वर्षांपुढील आहेत.
डोंबिवलीतील एका अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. नराधमांनी जानेवारी २०२१ पासून ते २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत पीडितेला नरक यातना दिल्या आहेत. दोन दिवसापूर्वी ७ आरोपींनी पीडितेला वडवली येथे नेत तिच्यावर एकाच वेळी सामूहिक अत्याचार केल्यानंतर तिला प्रचंड वेदना होऊ लागल्याने तिने ही घटना आपल्या आईला सांगितली.
यानंतर पीडित मुलीने मनपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बलात्कारसह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने २३ संशयित आरोपींना ताब्यात घेतले. संबंधित सर्व आरोपींनी पीडितेला डोंबिवली, बदलापूर, मुरबाड, राबळे अशा विविध ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला होता.







