पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : चारित्र्यावर संशय घेत एका इसमाने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना बुधवारी (दि. २२) रात्री साडेआठ वाजता जाधववस्ती, रावेत येथे उघडकीस आली. खैरूनबी उर्फ मुन्नी हैदर नदाफ (वय 38, रा. जाधव,वस्ती, रावेत) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मलिक शेंकुबर नदाफ (वय ३९, रा. अक्कलकोट एमआयडीसी, सोलापूर) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार हैदर साहेबलाल नदाफ (रा. लोणी स्टेशन, पुणे. मूळ रा. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत खैरूनबी हैदर नदाफ यांचे मावशीचा मुलगा आरोपी हैदर याच्यासोबत सन २००२ मध्ये लग्न झाले. पतीसोबत भांडण झाल्याने खैरूनबी आठ दिवसांपूर्वी मुलांना घेऊन जाधववस्ती येथे राहण्यास आली होती.
याबाबत हैदर याने खैरूनबी यांचा भाऊ फिर्यादी मलिक यांना फोन करून सांगितले होते. ‘खैरूनबी रागाच्या भरात गेली असेल. १० -१५ दिवसात ती परत येईल. वाट बघा’ अशी मलिक यांनी हैदरची समजूत काढली होती. रावेत येथे मागील दोन दिवसांपासून खैरूनबी घराबाहेर दिसल्या नाहीत अशी माहिती शेजारी राहणाऱ्या महिलेने खैरुनबी यांचा मित्र सलीम मणियार (वय ३५, रा. पाषाण) यांना दिली.
बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास सलीम हे खैरुनबी यांच्या घरी आले. घरात बघितले असता खैरुनबी या जमिनीवर पडल्या होत्या. त्यांच्या तोंडातून रक्त येत होते. सलीम यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.






