पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : दिवसा बंद असलेली घरे शोधून रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. घरफोडीतील दागिने घेणाऱ्या एका सोनाराला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या टोळीतील चार आरोपी फरार आहेत. आरोपींकडून २२० ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकल, गॅस सिलेंडर, होम थिएटर, बॅटऱ्या, कुलर, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण १८ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. साहील रमेश नानावत उर्फ अल्लु अर्जुन देवदास ऊर्फ दास रमेश नानावत आणि योगेश नुर सिंह अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर आणखी चौघा जणांचा शोध पोलिस घेत आहेत. या टोळीने तब्बल ४८ घरफोड्या केल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे, पुण्यात चोरीच्या पैशातून सावकारी करणाऱ्या अट्टल चोरट्याला चिंचवड पोलिसांनी गेल्याच महिन्यात बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्याकडून ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. चोरटा जे घर बंद आहे, त्याची दिवसभर पाहणी करायचा. त्यानंतर रात्री घरफोडी करायचा. लखन अशोक जेटीथोर असे अटक केलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे. त्याच्यासह रवी शिवाजी भोसले, सुरेश नारायण जाधव यांना देखील अटक करण्यात आली होती.






