मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या स्टार्सची नावे समोर आली होती. अशा परिस्थितीत अभिनेता गौरव दीक्षित याला देखील काही काळापूर्वी ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता आज (दि.२४ सप्टेंबर) अभिनेता गौरव दीक्षितला न्यायालयातून जामीन मिळाला आहे.
मिळालेल्या बातमीनुसार, मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेता गौरव दीक्षितला काही नियम आणि अटींच्या आधारे जामीन मंजूर केला आहे. इतकेच नाही तर ५० हजार रुपयांचे वैयक्तिक रोख रक्कम भरल्यानंतर, त्याची जामिनावर सुटका झाली आहे. या प्रकरणात, कोर्टाने म्हटले आहे की, आरोपपत्र दाखल होईपर्यंत गौरव दीक्षित यांना सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ४ पर्यंत एनसीबी कार्यालयात हजेरी नोंदवावी लागेल. यासह, अभिनेता गौरव दीक्षितला आपला पासपोर्ट तपास अधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल.
एवढेच नाही, तर आता अभिनेता गौरव दीक्षित कोर्टाच्या परवानगीशिवाय मुंबई शहर सोडू शकत नाही. गौरव दीक्षितला एनसीबीने २७ ऑगस्ट रोजी अटक केली होती. ड्रग प्रकरणात अभिनेता एजाज खानने दिलेल्या माहितीच्या आधारे गौरवला अटक करण्यात आली. मात्र, एजाज खान अजूनही तुरुंगात आहे आणि त्याला जामीन मिळालेला नाही. पण आजचा दिवस गौरव दीक्षितसाठी खरोखरच दिलासा देणारा आहे. आता गौरवला काही न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल.






