प्रतापगढ (उत्तर प्रदेश) : येथे एका कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ राडा झाला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये खासदार संगमलाल गुप्ता यांच्यासह अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. गुप्ता यांच्या गाडीचेही नुकसान झाले असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना पळूपळू मारल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सांगीपूर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या भागात आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी आणि आमदार आराधना मिश्र मोना पोहोचले होते. मात्र भाजप खासदार संगमलाल गुप्ता येथे पोहोचताच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा सुरू झाला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना पळूपळू मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी उग्र रुप धारण केल्याने फाटक्या कपड्यासह भाजप खासदार गुप्ता यांना येथून पळ काढावा लागला. या हाणामारीत कार्यकर्त्यांसह काही पोलीसही जखमी झाले आहेत.
भाजपा सरकार में जिस तरह सरेआम हिंसा को प्रोत्साहन-संरक्षण दिया गया, उसका ख़ामियाज़ा आज उसके ही सांसदों-विधायकों को भुगतना पड़ रहा है। ये अपने जनप्रतिनिधियों तक को संरक्षण नहीं दे पा रही है।
उप्र भाजपा सरकार में क़ानून-व्यवस्था फ़रार है।
जनआक्रोश का हिंसक होना अच्छा नहीं होता। pic.twitter.com/0p25LDNEQz
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) September 25, 2021
दरम्यान, या राड्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एक ट्वीट केले आहे. भारतीय जनता पक्षाने हिंसाचाराला प्रोत्साहन आणि संरक्षण दिल्याचा परतावा आज त्यांच्याच खासदारांना आणि आमदारांना मिळत आहे. हे लोक आपल्या नेत्यांनाही संरक्षण देऊ शकत नाही. योगींच्या राज्यात कायदा-सुव्यवस्था फरार आहे, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला.






