नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याकडून देशातील तीन राज्यांत पुढील २४ ते ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच देशातील तीन राज्यांना चक्रीवादळाचा धोका असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ज्या राज्यांना हवामान खात्याकडून चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे, त्यात पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश आणि ओडिसा या राज्यांचा समावेश आहे. तसेच येत्या १२ तासात चक्रीवादळाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्यानं या चक्रीवादळाला विध्वसंक गुलाब असं नाव दिलं आहे. आज शनिवार आणि उद्या रविवारी या वादळाचा प्रभाव जाणवेल, तर सोमवारपासून या वादळाचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच ओडिसा राज्याचा दक्षिण भाग आणि आंध्रप्रदेशच्या उत्तरेकडील भागात या वादळाचा जास्त प्रभाव असेल, असं सुद्धा सांगण्यात आलं आहे. तर त्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. २७ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल.
आंध्रप्रदेश आणि ओडिसा या राज्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी केला आहे. २६ सप्टेंबर पर्यंत आंध्रप्रदेशच्या कलिंगपट्टनम या भागात जोरदार पाऊस बरसणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पश्चिम बंगालमधील हावडा, पश्चिम आणि उत्तर परगणा आणि मिदनापूर या भागात वादळाचा फटका बसणार आहे.
दरम्यान, विध्वसंक गुलाब या वादळाच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी युनिफाईड कमांड सेंटर म्हणून आपत्ती नियंत्रण कक्ष तयार केला आहे. तसेच नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. सुमद्रकिनारी सुरक्षा वाढवली असून पर्यटकांनी काळजी घेऊन सुरक्षित ठिकाणी थांबण्याच्या सुचनासुद्धा केल्या आहेत.






