मुंबईत पतीकडूनच पत्नीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल; पतीला केली अटक

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : विवाहितेवर बलात्काराचा व्हिडीओ शूट करुन तिला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी महिलेच्या पतीलाही बेड्या ठोकल्या आहेत. पत्नीचे अश्लील व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला घटस्फोटासाठी ब्लॅकमेल करत पतीनेच ते व्हायरल केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील देवनार भागात ही घटना घडल्याची धक्कादायक माहिती आहे.

देवनारमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेने यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी दोघांनाही पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, ब्लॅकमेलरने आधी महिलेवर बलात्कार केला आणि या घटनेचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तिला धमकी दिली, की जर त्याला ५.२० लाख रुपये दिले गेले नाहीत, तर तो हे बलात्काराचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करेल.

महिलेने आरोपी ब्लॅकमेलरला पैसे दिले नाहीत, त्यामुळे त्या व्यक्तीने ते व्हिडीओ तिच्या पतीला पाठवले. आपल्या पत्नीला आधार देण्याऐवजी पतीनेही तिलाच ब्लॅकमेल करुन घटस्फोट मागण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर पतीने पत्नीचे व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे.

आरोपी पती मुंबईहून उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथील त्याच्या घरी पळून गेला होता. पोलिसांनी त्याला तिथून पकडले. त्यानंतर त्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीलाही पकडण्यात आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर बलात्कार, खंडणीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here