पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : भरधाव दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर जोरदार आदळून दोन अल्पवयीन मुले गंभीरपणे जखमी झाली. त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. येरवडा शास्त्रीनगर चौकात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.
ऋत्विक पंडित सोनवणे (वय १५, रा.विकफिल्ड वसाहत,रामवाडी ) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर महेश चंपालाल जागीड (वय १७,विकफिल्ड वसाहत,रामवाडी) हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋत्विक आणि महेश दोघे एकाच वसाहतीत राहण्यास असून मित्र आहेत. मंगळवारी सायंकाळी दोघे दुचाकीवरून येरवड्याच्या दिशेने निघाले होते. महेश हा दुचाकी चालवत होता, तर ऋत्विक हा त्याच्या मागे बसला होता.आगाखान पॅलेस समोरून भरधाव वेगाने जाताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने शास्त्रीनगर चौकातील झाडाला जोराने धडक दिली. धडकेत दोघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी तात्काळ दोघांना जवळील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान ऋत्विक सोनवणे याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक बहीण आहे. त्याच्या मृत्यूमुळे वसाहतीत शोककळा पसरली आहे.






