भावाला ऑडिओ मेसेज पाठवून गर्भवतीची आत्महत्या

लखनऊ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसैन) : बिजनौरमध्ये जलनपूर येथे एका गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. विवाहितेने जीव देण्यापूर्वी तिच्या भावाला एक ऑडिओ मेसेज पाठवला होता. यामध्ये तिने आपली व्यथा मांडत आत्महत्या करण्याच्या निर्णयाबद्दल माफी मागितली होती. धक्कादायक बाब म्हणजे या ऑडिओमध्ये तिने आपल्या भावाला सासरच्या लोकांवर कोणतीही कारवाई करु नका, असेही सांगितले.

याबाबत समजलेली माहिती अशी की, बिजनौरच्या सबदलपूर येथील रहिवासी ओमप्रकाश यांनी आपली कन्या पूजाचे लग्न १० महिन्यांपूर्वी जलीलपूरमधील खानपूर खादर येथील रहिवासी संजीव याच्याशी लावले होते. ओमप्रकाश यांनी लेकीच्या लग्नात कारही दिली होती. लग्नापूर्वी ओमप्रकाश यांना सांगण्यात आले होते, की जावई संजीव रेल्वेमध्ये तिकीट पर्यवेक्षक आहे. पण लग्नानंतर तो बेरोजगार असल्याचे समजले. तेव्हापासून दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.

पूजाच्या लग्नानंतरही तिच्या सासरी हुंड्याची मागणी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. हुंड्यासाठी तिला सातत्याने त्रास दिला जात होता. त्यामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. पूजाच्या माहेरच्यांनी ती ८ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. पूजाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ५ दिवसांपूर्वी हुंड्यावरील वादानंतर ते संजीवच्या घरी त्याच्याशी बोलण्यासाठीही आले होते. तेव्हाही दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला होता.

पूजाने तिचा भाऊ राजनला एक ऑडिओ मेसेज पाठवला होता. त्यात ती म्हणाली होती की, “दादा, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले आहे. पण आज मी हे पाऊल नाईलाजाने उचलत आहे. तू आपल्या आई-बाबांना समजावून सांग. माझ्या सासरच्या घरातून कोणतीही वस्तू परत घेऊ नका, एक चमचाही नाही. जेव्हा तुमची बहीणच राहणार नाही, तेव्हा त्या घराशी काय संबंध असेल?” एवढेच नाही तर पूजा म्हणाली, “माझ्या सासरच्यांवरही कोणतीही कारवाई करू नका. त्यांना क्षमा करा”

दरम्यान, पूजाचे वडील ओमप्रकाश यांनी हुंड्यासाठी मुलीची हत्या केल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. यानंतर पोलिसांनी पूजाच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here