ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : पालघर जिल्ह्यातील रानशेत गावात सोमवारी ८ वर्षांच्या मुलीचा खून केल्याप्रकरणी या मुलीच्या एका नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने जमिनीच्या वादातून या निष्पाप मुलीचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपीने या मुलीला धारदार शस्त्राने भोसकून ठार मारले. आरोपीचा आणि मयत मुलीच्या वडिलांचा जमिनीवरून वाद होता. या वादातूनच ही हत्या करण्यात आली आहे.
या खून प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचे नाव प्रमोद घोशे (४६ वर्षे) असं आहे. मयत मुलीचे नाव वर्षा असून प्रमोदचा वर्षाचे वडील सुरेश घोशे याच्यासोबत वाद होता. प्रमोद हा सुरेश यांचा लांबचा नातेवाईक असल्याचं कळालं आहे. प्रमोद आणि सुरेश यांच्यात वडिलोपार्जित जमिनीवरून वाद सुरू होता, ज्यावरून दोघांमध्ये भांडणंही झाली होती. वडिलांवर असलेला राग प्रमोदने त्यांच्या मुलीवर म्हणजेच वर्षावर काढला. तिला धारदार शस्त्राने किमान १० वेळा भोसकून प्रमोदने ठार मारले
प्रमोद वर्षावर हल्ला करत असल्याचे पाहून एक व्यक्ती वर्षाच्या मदतीसाठी धावून आला होता, मात्र प्रमोदने त्याच्यावरही हल्ला करून त्याला जखमी केला आहे. वर्षाला ठार मारल्यानंतर प्रमोद जवळच्याच जंगलात पळून गेला होता. पोलिसांत वर्षाच्या हत्येबाबतची तक्रार करताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत प्रमोदला शोधून काढत त्याला अटक केली. प्रमोदला हत्येच्या गुन्ह्याखाली ही अटक केल्याचं डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी सांगितले आहे.






