शादी डॉट कॉमवरील ओळख पडली महागात; महिलेला ४ लाखांना फसविले

पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : शादी डॉट कॉम या वेबसाईटवरून ओळख झालेल्या एका व्यक्तीने दुबईवरून आणलेले मौल्यवान दागिने व इतर वस्तू सोडविण्याचे सांगत कस्टम ड्युटी म्हणून एका महिलेला त्याच्या बँक खात्यामध्ये वेळोवेळी पैसे भरायला लावून तिची ४,२८,८००/- रु. ची फसवणूक केली आहे. ही घटना दि. १ मार्च २०२१ ते २० मार्च २०२१ या कालावधीमध्ये मांजरी येथे राहणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेसोबत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात मोबाईलधारक व बँक खातेधारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांजरी येथे राहणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेला एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून शादी डॉट कॉम या वेबसाईटवर असलेली महिलेची प्रोफाईल आवडल्याचे सांगून त्यांच्याशी ओळख वाढविली. आरोपीने त्याची खरी ओळख लपवून महिलेला भेटण्यासाठी दुबईवरून आल्याचे भासविले. तसेच दुबईवरून येताना महिलेसाठी मौल्यवान दागिने व इतर वस्तू घेऊन आल्याचे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर दिल्ली एअरपोर्ट येथे कस्टम अधिकाऱ्याने त्याला अडविले असून, त्याने आणलेल्या मौल्यवान वस्तूंवर कस्टम ड्युटी भरावी लागेल असे सांगितले. त्याचवेळी एका अज्ञात मोबाईलधारकाने कस्टम अधिकारी बोलत असल्याचे महिलेला सांगितले व त्या मौल्यवान वस्तू सोडविण्यासाठी कस्टम ड्युटी म्हणून महिलेकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. तसेच आरोपीच्या बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगून महिलेची ४,२८,८००/- रु. ची फसवणूक केली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक एस. एस. गाडेकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here