ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : दिवसाढवळ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला टिटवाळा पोलिसांनी दोन तासात अटक केली आहे. पोलिसांनी चोरट्याकडून लूटण्यात आलेले दागिने हस्तगत केले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे नाव रोहीदास शांताराम वेढे असे आहे.
नेमकं काय घडलं?
कल्याणनजीक टिटवाळ्यात एका ज्वेलर्सच्या दुकानात लूटीची घटना ताजी असताना शुक्रवारी (1 ओक्टोबर) पावणे चार वाजेच्या सुमारास टिटवाळा येथील मांडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. मांडा परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय रिमा ओंकार कुंभार या महिला रस्त्याने चालत जात असतान एक चोरटा रस्त्याच्या एका बाजूला उभा होता. रिमा चालत जात असताना चोरट्याजवळ पोहोचल्या तेव्हा त्याने रिमा यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर चोरटा पसार झाला.
पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?
संबंधित घटना सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. पोलीस मित्र लिसान काबाडी यांच्या मदतीने या चोरट्याचा पोलिसांना सुगावा लागला. पोलीस सचिन गायकवाड, सुनिल कोर, किरण जाधव या तिघांनी या चोरट्याला ताब्यात घेतले.
चोरट्याला दोन तासात बेड्या
रोहिदास वेढे असे या चोरट्याचे नाव आहे. तो मूळचा अकोले येथे राहणार आहे. तो सध्या मांडा येथील चाळीत राहतो. त्याच्याकडून चोरीस गेलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत. या चोरट्याने याआधी देखील असा काही प्रकार केला का? याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, चोरट्याला दोन तासात अटक केल्याने टिटवाळ्यात पोलिसांचे कौतुक केले जात आहे.






