यवतमाळ (क्राईम रिपोर्टर आसिफ कुरेशी) : येथील वाघापूर परिसरातील पटवारी कॉलनी मध्ये राहणाऱ्या युवकाला उत्तर प्रदेशातील कानपूर येथे शुक्रवारी अटक केली. गेल्या काही दिवसांपासून धर्मांतराशी निगडीत टोळीतील सदस्य यवतमाळ जिल्ह्यात आढळले. पुसद येथून लखनऊ एटीएसने डॉ. फराज शहा याला अटक केली. त्यातूनच यवतमाळच्या युवकाचा सुगावा लागला.
धीरज गोविंद जगताप (देशमुख) (३८) असे लखनऊ एटीएसने अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. तो पुसद शहरातील वसंत नगर भागात राहणारा डॉक्टर फराज शहा सोबत धर्मांतराचे काम करत होता. डॉ. फराज याला लखनऊ एटीएसने दीड महिन्यापूर्वी पुसद शहरातून अटक केली. त्यानंतर धर्मांतरासाठी काम करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड झाला. त्याअंतर्गत राज्यासह देशभरात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. याच कारवाईचा भाग म्हणून शुक्रवारी यवतमाळ शहरातील धीरज जगताप या युवकाला कानपूर मध्ये अटक झाली. धीरज यवतमाळ मध्ये कंत्राटदार म्हणून काम करत होता. मात्र काही दिवसानंतर त्याने धर्मांतर करून तो घराबाहेर पडला तो घरी फिरकत नसल्याने त्याची पत्नी मुलीला घेऊन निघून गेली.
लखनऊ एटीएसने धिरजला अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर यवतमाळातील स्थानीक एटीएसच्या पथकाने धीरजच्या वाघापूर परिसरातील घराची पाहणी केली. मात्र त्याचे त्याचे वृद्ध वडील आढळून आले. धीरज बाबत त्याठिकाणी फारशी माहिती मिळाली नाही. धीरज हा धर्मांतराच्या प्रकियेत अर्थ सहाय्य करत असल्याचा आरोप आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. धर्मांतराच्या प्रक्रियेत यवतमाळातील युवकाचा सहभाग असल्याचे पुढे आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे.






