परंडा (प्रतिनिधी) : येथे अवघ्या १० वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीवर 23 वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. तिच्यावर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
परंडा तालुक्यातील एका गावातील पीडित मुलगी गुरुवारी आपल्या घरून दळण दळून आणण्यासाठी बाहेर पडली होती. त्या दरम्यान गावातील २३ वर्षीय आरोपी तिच्यावर पाळत ठेऊन होता. आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने तिचे तोंड दाबून तिला बाजूच्या एका शेतात नेले. आरोपीने प्रतिकार करणाऱ्या चिमुकलीला मारहाणदेखील केली. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
आरोपी पीडितेला तिथेच सोडून पळून गेला. दरम्यान पीडित मुलीने रडत आपल्या घरी जाऊन झालेली हकीगत आई-वडिलांना सांगितली. तिच्या आई-वडिलांनी तात्काळ परंडा पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी आपबीती कथन केली. पोलिसांनी तक्रारीनुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेतला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी यंत्रणा फिरवित आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
क्रूर पद्धतीने मारहाण आणि लैंगिक अत्याचार केल्याने पीडिता जखमी झाली होती. दरम्यान घरी आल्यानंतर रक्तस्राव वाढत असल्याने तिला परंडा तालुक्यातील एका रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिची प्रकृती जास्तच खालावल्याने उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलीसदेखील तिचा जवाब घेण्यासाठी रुग्णालयात जाणार आहेत.






