लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त!

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र मागील अनेक दिवसांपासून येत असलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येत आहेत. राज्य सरकारकडून देखील शाळा, मंदिरे पुन्हा सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच, दुसरीकडे राज्यातील लसीकरण मोहिमेने देखील हळूहळू वेग घेतला असल्यामुळे व्यापक प्रमाणावर नागरिकांना लसीकृत केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या जरी कमी होताना दिसत असली, तरी दुसरीकडे पुण्यात दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण काहीसे वाढले असल्यामुळे प्रशासनासाठी ही चिंतेची बाब ठरली असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर पुण्यात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण हे पहिल्या डोसनंतर कोरोनाची बाधा होण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे अजित पवार यांनी यावेळी नमूद केले. पुणे शहरात कोरोनाबाधित होण्याचा दर २.१ टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये २.२ टक्के आणि पुणे ग्रामीणमध्ये ३.८ टक्के आहे. गेल्या आठवड्यापेक्षा परिस्थिती सुधारली आहे. मृत्यूदर देखील काहीसा कमी झाला आहे.

मागील आठवड्यात ५ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणात ५ टक्के वाढ झाली आहे. पहिला डोस घेतल्यानंतर किती लोकांना बाधा होत आहे, याचा सर्वे केल्यानंतर त्यात ०.१९ टक्के लोकांना बाधा होत असल्याचे लक्षात आले आणि दुसरा डोस घेतल्यानंतर हे प्रमाण ०.२५ टक्के एवढे असल्याचे अजित पवार म्हणाले. गेल्या १५ दिवसांत पुण्यात रोजच्या रुग्णांमध्ये ३० टक्के आणि अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये १९ टक्के घट दिसून आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here