पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात, बलात्काराच्या घटनांनीही पुण्य-नगरी हादरुन गेली होती. आता, शहरातील कोथरुडमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानेच २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी, बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात आरोपी पीएसआयविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. प्रवीण नागेश जर्दे असे आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून तो पीएसआय पदावर कार्यरत आहेत. सध्या, येरवाडा पोलीस वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षकपदी तो कार्यरत आहे. आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून पीडिताला पुणे आणि परिसरातील विविध ठिकाणी नेत तिच्यार वारंवार बलात्कार केला. तसेच, आपले पहिले लग्न झाल्याचेही आरोपीने लपवून ठेवल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पीडिताने लग्नाची मागणी केल्यावर तिला टाळाटाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी जर्दे हा यापूर्वी २०१८ मध्ये कोथरुड पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्यावेळी, एका प्रकरणात तपास करताना आरोपीच्या बहिणीसोबत जर्देची ओळख झाली. त्यानंतर, आपलं पहिलं लग्न झाल्याचं लपवून ठेवत आरोपीने तिच्याशी जवळीस वाढवली. तसेच, लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने बलात्कार केला. त्यानंतर, पोलीस खात्याचा धाक दाखवत माझं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही, असे म्हणत फिर्यादी तरुणीलाच जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. याप्रकरणी कोथरुड पोलीस अधिक तपास करत आहेत.






