लखनऊ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसैन) : देशात महिला अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. दररोज देशाच्या कुठल्या न कुठल्या काण्याकोपऱ्यातून बलात्काराच्या घटना समोर येताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथील एका नामांकित कॉलेज रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिला रुग्णाला बाथरुममध्ये घेऊन जात एका आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. या नराधमाला रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने रंगेहाथ पकडलं आहे. त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.
संबंधित घटना ही अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या जेएन मेडिकल कॉलेजमध्ये उघड झाली आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी हा रुग्णालय प्रशासनाशी संबंधित नाही. तो महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने रुग्णालयात येत होता. पीडित महिला ही गेल्या तीन महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहे.
पीडित महिलेवर सध्या रुग्णालयातील रिकव्हरी वॉर्डात उपचार सुरु आहेत. या दरम्यान शुक्रवारी (1 ऑक्टोबर) अचानक महिला आपल्या बेडवर दिसली नाही. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या परिचारिकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तिचा पत्ता लागत नव्हता. अखेर ही बातमी संपूर्ण रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली. रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक महिलेचा शोध घेऊ लागले.
यावेळी एक सुरक्षा रक्षक जेव्हा बाथरुममध्ये महिलेचा शोध घेण्यासाठी पोहोचला तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण तिथे एक तरुण एका महिलेवर बलात्कार करताना त्याने बघितलं. या प्रकारामुळे सुरक्षा रक्षकाला मोठा धक्का बसला. त्याने वेळेचा विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांना आवाज दिला. त्यानंतर त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं. तसेच महिलेला डॉक्टर आणि पारिचारिकांच्या स्वाधीन करण्यात आलं.






