अहमदनगरमध्ये पोलीस उपअधिक्षकांवर निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा गोळीबार

अहमदनगर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राहुरी येथे बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याने पोलीस उपअधीक्षकावर गोळी झाडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने हा हल्ल्यात पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागली नाही आणि दुखापतही झालेली नाहीये. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे याच्या विरुद्ध राहुरी तालुक्यातील महिलेच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल केल्या नंतर यासंदर्भात पीडित महिलेने जबाब दिल्यास आणखी अडचणी निर्माण होण्याची भीती बडतर्फ पोलीस अधिकारी लोखंडे यांच्या मनात आल्याने आज सकाळी लोखंडे पीडित महिलेच्या घरात शिरला. यानंतर त्याने त्याच्या जवळील रिव्हॉल्व्हर पीडित महिला आणि तिच्या दोन मुलींवर रोखून धरली. यासंदर्भात माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे आपल्या फौजफाट्यासह पीडितेच्या घरी दाखल झाले. त्यावेळी दहशत निर्माण करण्यासाठी लोखंडेने हवेत एक गोळी देखील झाडली.

त्यानंतर चर्चेतून मार्ग काढू असे सांगून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बडतर्फ पोलीस लोखंडे यांने बंदुकीच्या निशाण्यावर धरलेल्या मुलांना, त्याच्या ताब्यातून सुखरूप बाजूला केलं. यानंतर आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी बडतर्फ पोलीस लोखंडे यांच्यावर झडप घातली. त्यावेळी लोखंडे याने मिटकेंवर गोळी झाडली. सुदैवाने बंदुकीतून सुटलेल्या गोळीची दिशा चुकविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बडतर्फ पोलीस अधिकाऱ्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले असून बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here