मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने डोंगरीत मोठी कारवाई केली. राजस्थानहून हेरॉईनचा साठा विकायला आलेल्या दोघा ड्रग्ज माफियांना पोलिसांनी डोंगरीत रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून पाच किलो वजनाचे व १५ कोटी किमतीचा हेरॉईन ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला.
राजस्थानच्या प्रतापगड येथील ड्रग्ज माफिया मुंबईतील नशेबाजांसाठी हेरॉईन विकण्यासाठी येणार असल्याची खबर आझाद मैदान युनिटला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने त्या ड्रग्ज माफियांवर पाळत ठेवली होती. ते तस्कर बसने मुंबईत आल्यानंतर दक्षिण मुंबईतील एका लॉजमध्ये थांबले होते. या सर्व बाबींची शहानिशा करून हेरॉईन स्थानिक पेडलर्सच्या हाती पडण्याआधीच पोलिसांनी कारवाई केली. हकीम गुल खान (५६) आणि जीवनलाल मिणा (२१) या दोघांना हेरॉईन ड्रग्ज साठय़ासह डोंगरीमध्ये रंगेहाथ पकडले.
हे ड्रग्ज तस्कर मुंबईतील ज्या पेडलर्संना ड्रग्ज विकत होते त्यांची नावे पोलिसांच्या रडारवर आली असून लवकरच त्यांचाही बंदोबस्त केला जाईल, असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या १० महिन्यांत अमली पदार्थविरोधी कक्षाने शहरात धडक कारवाया करत तीन हजार ३३३ गुह्यांमध्ये तीन हजार ५७५ ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्या, तर ८६.५०कोटी किमतीच्या तीन हजार ८१३ किलो ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.






