जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : जिल्ह्यातील जामनेर शहरात बारावीत शिकणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीने इंटरनेटवरील ‘पब्जी’ गेम खेळण्याच्या नादात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.१०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. त्यात तिने असं लिहलं आहे की, ‘मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत असून, यात माझ्या घरच्यांचा किंवा कोणाचाही दोष नाही’ असा उल्लेख केला आहे. ही सुसाईड नोट पोलिसांनी तपासकामी जप्त केली आहे.
तरुणीचे वडील हे स्वत: पेशाने डॉक्टर असून ते एका स्थानिक डॉक्टरकडे सहाय्यक डॉक्टर म्हणून काम पाहतात. रविवारी सायंकाळी घरात कुणीही नसताना तरुणीने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी तिच्या हातावर वार केल्याने जखमा झाल्याचं आढळून आलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर जामनेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी ही सतत मोबाइलमध्ये दंग असल्याचं तिच्या पालकांनी पोलिसांना माहिती दिली आहे. तिच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिचा मोबाइल ताब्यात घेतला. तेव्हा मोबाइलमध्ये पब्जी गेमचे अप्लिकेशन सुरू असल्याचे दिसून आले. याच गेममुळे तरुणीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असण्याची दाट शक्यता आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण जामनेरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जामनेर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेची नोंद करण्यात आली आहे.






