मुंबई (हितेश मिस्त्री) – कोरोना संक्रमणाच्या काळात महाराष्ट्र पोलीस दल नागरिकांच्या संरक्षणासाठी अहोरात्र दक्ष असताना, आपले नियमित कर्तव्यदेखील पार पाडत असल्याचे आपल्याला पदोपदी दिसून येत आहे. गेल्याच शुक्रवारी कल्याण येथील मटकाकिंग जिग्नेश ठाकूरची हत्या झाली होती. या गुन्ह्यातील मुख्य शूटरला अवघ्या तीन दिवसात गुजरात येथून अटक करण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत भुरके, संदीप भांगरे, हेमंत महाले आणि बाळू मुकणे यांच्या पथकाने तातडीने तपास करुन शूटरला बेड्या ठोकल्याबद्दल गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी वैयक्तिकरित्या या पथकाचे विशेष कौतुक करीत प्रत्येकी पाच हजारांचे पारितोषिक जाहीर केले आहे.
जिग्नेशचा बालपणीचा मित्र धर्मेंद्र उर्फ ननू शहा यांचे धंद्यातील पैशांवरून जिग्नेशसोबत भांडण झाले होते. या वादाचे पर्यावसान हाणामारीपर्यंत पोहचले. यामुळे धर्मेशने जिग्नेशला ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार धर्मेशने जयपाल व इतर साथीदारांची मदत घेत शुक्रवार (दि.३१) रात्री कल्याण स्टेशनजवळच्या सुयश प्लाझामध्ये जिग्नेशवर पाच गोळ्या झाडून त्याचा खून केला होता. या कटातील मुख्य शूटर जयपाल फरार होता. दरम्यान अहमदाबाद येथून जयपाल उर्फ जपान यास अटक करण्यात या पथकाला यश आले आहे.







