स्व. बाळासाहेब टोके : एका झंझावाताचा अंत

    चेहरा होता हसतमुख,
    कधी ना दिले कोणास दुःख,
    मनी होता भोळेपणा,
    कधी ना दाखविला मोठेपणा,
    उडूनी गेला अचानक प्राण,
    पुर्नजन्म घ्यावा हीच आमुची आण.

    अत्यंत मनमिळावू, मनाने हळवे, तितकेच प्रेमळ सुध्दा, संयुक्त परिवाराच्या लहानांपासून ते मोठया वयापर्यंतच्या असलेल्या प्रत्येक व्यक्तिची जणू आपणच काळजी घेण्याचा वसा घेतला आहे. याची जाणीव ठेवून प्रत्येका बद्दल काळजीपुर्वक वागणारे आणि तितक्याच तत्परतेने परिवारा व्यतिरिक्त सुध्दा प्रत्येकासाठी पावलो-पावली धावून जाणारे आमचे वडील कै.बाळकृष्ण जगन्नाथ टोके आज आमच्यात नाहीत पण त्यांची आठवण मात्र कायम आमच्या मनात अखंड दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सदैव तेवत राहील. कै.बाळकृष्ण जगन्नाथ टोके यांचा जन्म ५ जुन, १९५४ रोजी निमखेडी बु. जि.जळगांव येथे झाला. श्री. जगन्नाथ हरी टोके आणि गं.भा.सुमनबाई जगन्नाथ टोके यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला.

    शेतकरी कुटूंबात जन्मल्यामुळे लहानपणापासुन अत्यंत काबाड कष्ट करण्याची शक्ती त्यांच्या धमन्यांमध्ये असल्यामुळे कार्यतत्परता, प्रामाणिकपणा हे दोन्ही गुण त्यांच्यात पुर्वीपासूनच होते. शेती सोबतच त्यांना दुग्ध व्यवसायात पण तितकाच रस होता आणि हा दुग्ध व्यवसायाचा अनुभव त्यांना त्यांच्या पुढील नोकरीत अत्यंत उपयोगी ठरला. आदरणीय डॉ.डी.के. टोके त्यावेळेस विकास जिल्हा दुध संघाचे व्यवस्थापक होते. त्यावेळेस त्यांची भेट निमखेडी बु. येथे दुग्ध सोसायटीत झाली. त्या दरम्यान डॉ. टोकेंनी कै.बाळकृष्ण टोके मधले दुग्ध व्यवसायाविषयी असलेले त्यांचे ज्ञान त्यांनी पारखले आणि त्यांना विकास जिल्हा दुध संघ जळगांव येथे नोकरीवर रुजू करुन घेतले वेळोवेळी डॉ. टोके यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

    अगदी खडतर प्रवास करत त्यांची सुरुवात झाली. मात्र २००/- रु.पगारापासून त्यांच्या दुध संघात प्रवास सुरु झाला. परिवार मोठा असल्यामुळे जबाबदाऱ्या पण तितक्याच मोठया होत्या. तरी सुध्दा त्यांच्या चपळ स्वभावामुळे त्यांनी प्रत्येक संकटातून नेहमी हसतमुखपणे मार्ग काढला. त्यांना सहा भावंडांनी वेळोवेळी त्यांच्या पाठीशी राहून मोलाचे सहकार्य केले. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असून त्यांच्या पालन-पोषण आणि शिक्षणात इतक्या बिकट परिस्थितीतसुध्दा कुठलीच कमतरता पडू दिली नाही. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे ते प्रत्येकाला आपलसं करुन घेत. त्यात वयोमर्यादेचे भान त्यांनी कधीच ठेवले नाही. प्रत्येक वयोगटात त्यांचे मित्र होते. प्रत्येक मित्राच्या मदतीला धावून जाणे त्याच बरोबर गोर-गरीब व गरजूंची मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असे ते समजायचे. त्यामुळे ते दुध संघाच्या कर्मचारी वृन्दांमध्ये अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे व होतकरु आणि विश्वासू स्वभावामुळे त्यांना आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.सी.एम.पाटील यांची अखंड साथ जिवलग मैत्रीच्या स्वरुपात प्रत्येक सुख -दु:खात त्यांना लाभली.

    तद्नंतर दुध संघाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सुध्दा विकास दुध संघाचे चेअरमन सौ. मंदाताई एकनाथराव खडसे यांनी त्यांची स्वीय सहाय्यक म्हणून नेमणुक केली. अत्यंत कर्तव्य निष्ठेने शेवटच्या क्षणापर्यंत कार्यशील राहून त्यांनी पारदर्शकपणे दुध संघाच्या प्रगतीत मोलाचा हातभार लावला होता. पण अल्पशा आजाराने त्यांच्यावर दि.०९ ऑक्टोबर २०२१ रोजी काळाने घाला घातला. काळ जरी त्यांच्या साथीला नसला तरी त्यांचे कार्य आणि त्यांच्या सहृदय स्वभावामुळे लोकांच्या मनात त्यांच्या स्मृती, फुलांतील सुगंधाप्रमाणे अखंडपणे दरवळत राहिल…

    ज्योत अनंतात विलीन झाली
    स्मृती आठवणींना दाटून आली
    भाव सुमनांची ओजंळ भरुनी,
    वाहतो आम्ही श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
    समस्त टोके परिवाराला हे दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देवो, ही ईश्वराचरणी प्रार्थना!

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here