ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : संपत्तीच्या वादातून सासऱ्याने आधी सुनेच्या डोक्यात वार केले, आणि मग घर पेटवून देत स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बदलापुर येथे घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, बदलापूर पश्चिमेच्या शनि नगर परिसरातील हेरंब सृष्टी अपार्टमेंटमध्ये किसन जाधव हे मुलगा, सून, नात आणि नातू यांच्यासह वास्तव्याला आहेत. आज दुपारच्या सुमारास जाधव यांचा मुलगा कामावर गेला होता, तर मुलाची दोन्ही मुलं बाहेर गेली होती. यावेळी किसन जाधव आणि त्यांची सून असे दोघेच घरात असताना या दोघांमध्ये प्रॉपर्टीच्या कारणावरून वाद झाले. या वादात जाधव यांनी सुनेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. यानंतर सुनेने आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांनी तिथे धाव घेतली आणि सुनेला रुग्णालयात नेले. मात्र यानाबतर किसन जाधव यांनी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतून कपाट लावले आणि संपूर्ण घर पेटवून दिले. यानंतर स्वतः नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जाधव यांच्या घरातून धूर निघू लागल्यानंतर शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.
अग्निशमन दलाने जाधव यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता संपूर्ण घर जळून खाक झाले होते, तर जाधव हे अर्धमेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने इमारतीखाली आणले असता इमारतीच्या दारातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जाधव यांच्या जखमी सुनेवर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हा प्रकार संपत्तीच्या वादातूनच घडल्याची माहिती जाधव कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.






